बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आज म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने त्याच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली असून त्याच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. शाहरुखने दीर्घकाळानंतर इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त कमबॅक केले आहे. याआधी शाहरुख काही चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसला. हा ऍक्शन-पॅक टीझर किती जबरदस्त आहे, हे तुम्हाला पाहिल्यावरच कळेल.
या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहेत. 'पठान'चा टीझर रिलीज करताना शाहरुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले होते, " अपनी कुर्सी की पेटी बांध लिजिए… पठाण टीझर आऊट. पठानला 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये सिनेमागृहात पहा." पठाणचा टीझर ऍक्शन आणि रोमान्सने भरलेला आहे. टीझरमध्ये शाहरुख खान जबरदस्त ऍक्शन ट्विस्टमध्ये दिसत आहे. याशिवाय शाहरुख आणि दीपिका यांची केमिस्ट्रीही जबरदस्त दिसत आहे.
टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते खूप उत्साहित झाले आहेत. टीझरमधील किंग खानचा आकर्षक लुकची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. लांब केसांसह शाहरुखचा हा लूक 'डॉन 2' ची आठवण करून देणारा आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' पुढील वर्षी 25 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
त्यानंतर किंग खान 'जवान' आणि 'डंकी'मध्येही दिसणार आहे. याआधी 2018 च्या 'झिरो'मध्ये तो शेवटचा मोठ्या पडद्यावर दिसला होता. त्याचवेळी तो आर माधवनच्या 'रॉकेटरी' आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये कॅमिओ करताना दिसला होता आणि सलमान खानच्या 'टायगर 3'मध्येही तो कॅमिओ करणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile